निवडणूक जिंकण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा – मंगेश खैरनार, Poller Minds
निवडणुकीत तिकीट देताना ‘विजयाची खात्री’ हा एकमेव निकष सर्वच राजकीय पक्ष लावतात. मग या निकषात सहाजिकच राजकीय नेते, त्यांचे वारसदार आणि मनी-मसल पॉवर असणाऱ्यांचाच नंबर लागतो. मग इतरांनी राजकारण करायचेच नाही का? निवडणुका लढवायच्या नाहीत का? याचे उत्तर आहे… हो लढवायच्या; पण पूर्ण तयारीनिशी! ‘फक्त लढ म्हणा’ म्हणून कोणतीही निवडणूक ना लढता येते ना जिंकता. त्यासाठी लागतात अपार कष्ट, काम करण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काटेकोर नियोजन. या गोष्टी असतील तर तुम्हाला येत्या निवडणुकीत विजयी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. Post By Poller Minds Leading Political consultancy and election management company
१. निवडणूक का लढवायची आहे हे आधी ठरवा :
निवडणुकीच्या राजकारणात आपण कशासाठी येत आहोत हे आपल्या मनामध्ये पक्के हवे. समाजसेवा करायची आहे हे उत्तर अगदीच पोकळ आणि वरवरचे झाले. राजकारण करण्यासाठी आपली मनाची बैठक योग्य आहे का? आपला तेवढा आवाका आहे का? आपली आर्थिक स्थिती तेवढी भक्कम आहे का? ती नसली तरी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण सहजपणे करू शकतो का? त्यासाठी आवश्यक असणारा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे पाठबळ, कुटुंबाचा पाठिंबा आपल्या जवळ आहे का? नेतृत्व करण्याची क्षमता आहे का? समस्यांची जाण आणि त्यावर उत्तर शोधण्याची धडपड करण्याची तुमची तयारी आहे का? यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे होय असतील तर तुम्ही निवडणूक लढवण्याचा नक्की विचार करायला हवा. जर यातील काहीच माहिती नसेल किंवा क्षमता नसतील तर तुम्ही निवडणुकीच्या भानगडीत न पडलेलेच बरे.
जर तुम्ही शिक्षित आहात, सध्याची व्यवस्था बदलावी अशी तुमची मनापासूनची इच्छा आहे, 24 तास काम करण्याची तयारी आहे, फक्त पैसे आहेत म्हणून प्रतिष्ठा मिळवायची आहे हे उद्दिष्ट नसेल तर कोणत्याही अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवू शकता. कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करू शकता. प्रस्थापितांना तोंड देऊ शकता किंवा सध्या निवडणुकीच्या राजकारणात असाल तर अधिक यशस्वीपणे पुढे जाऊ शकता. त्यामुळे जर निवडणूक लढवायची असेल तर तुमचा अंतिम हेतू काय आहे, हे मनात पक्के करा. त्यानंतरच निवडणुकीच्या राजकारणात अवश्य आणि जोमाने उतरा.
२. पक्ष निश्चित करा :
राजकारणात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा साधारण वैचारिक पाया ठरलेला असतो. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी जोडलेला असतो. कोणाचे वडील, चुलते, भाऊ, आजोबा, आई, वहिनी, मामा असे कोणीतरी कुटुंबातील सदस्य हे कोणती ना कोणती निवडणूक लढलेले असतात किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षाशी बांधील असतात. त्यामुळे कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपणही त्याच पक्षाशी जोडले जातो आणि त्याच पक्षाचे काम करण्यास सुरवात करतो. मात्र सध्या ‘गुलाल तिकडे चांगभले’ म्हणजेच सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा कल वाढला आहे. सत्ताधारी पक्षाला सोबत जोडले जाणे यात गैर काही नाही, मात्र त्या पक्षात तुम्हाला नेमका किती वाव आहे हे पहिल्यांदा ठरवायला हवे किंवा त्याचा अंदाज यायला हवा. जर तुम्ही नवे इच्छुक कार्यकर्ते आहात आणि सत्ताधारी पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असेल तर तुम्हाला लगेचच संधी मिळणे अवघड असते. अशावेळी चांगल्या विरोधी पक्षांमध्ये राहणेही कधीकधी फायद्याचे असते. त्यामुळे राजकीय परिस्थितीचा योग्य तो अंदाज घेऊन पक्षाची निवड करायला हवी. ही निवड करताना संबंधित राजकीय पक्षाचे तुमच्या मतदारसंघातील वर्चस्व, त्यांना असणारा पाठिंबा, गेल्या 4-5 निवडणुकांमध्ये त्या पक्षाला मिळालेली मते, मतदारसंघातील कोणत्या भागात आपल्या विचारांच्या मतदारांची संख्या जास्त आहे. कोणत्या भागात विरोधी मतदारांचे पॉकेट आहे. कोणत्या भागातील मतदार हे ‘फ्लोटिंग’ आहेत. नवमतदार कोणत्या परिसरामध्ये जास्त आहेत, या सर्वांचा अभ्यास आपण पक्ष निश्चित करण्यापूर्वी करायला हवा. तुमच्या पक्षाचा शहर पातळीवरील नेता कोण आहे, राज्यपातळीवरील नेता कोण आहे, त्याची सध्याची लोकप्रियता कशी आहे, राज्यात-केंद्रात कोणाची सत्ता आहे, महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा कल आहे, या गोष्टींचाही अंदाज आपण पक्ष निवडण्यापूर्वी करायला हवा. जर कोणताही पक्ष आपल्याला योग्य वाटत नसेल किंवा अपेक्षित असणाऱ्या पक्षात तुम्हाला स्थान मिळत नसेल तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी आहे का? त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आपल्याकडे आहेत का हेही आवर्जून तपासायला हवे. सध्याची मतदारसंघाची रचना लक्षात घेता बहुसदस्यीय पद्धतीमध्ये राजकीय पक्ष हाच महत्त्वाचा ठरतो, असा आत्तापर्यंतचा अभ्यास आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढविण्याऐवजी मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवणे कधीही फायदेशीर ठरते. त्यामुळे निवडणूक लढवण्यापूर्वी आपल्या पक्षाची निवड काळजीपूर्वक करायला हवी. निवडणूक जिंकण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे.
३. आपल्यामतदारसंघाचानीट अभ्यास करा :
ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवू इच्छिता त्या मतदारसंघाची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. सध्या मतदारसंघ रचना, त्याच्या भौगोलिक सीमा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. पण जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या मतदारसंघ रचना कशी होत आहे, याकडेही बारकाईने लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. शक्यतो तुम्ही सध्या काम करत असलेला मतदारसंघ निवडणुकीसाठी तुम्हाला योग्य असेल. ज्या ठिकाणी तुमचा जनसंपर्क आहे, ज्या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या पक्षाचे वर्चस्व आहे, अशा मतदारसंघात निवडणूक लढविणे सोपे जाते. मतदारसंघ रचना निश्चित झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघाची एकूण लोकसंख्या किती आहे. त्यातील मतदारांची संख्या किती आहे. त्यात स्त्री-पुरुष किती आहेत. नवमतदारांची संख्या किती आहे. मतदारसंघातील जातीचे गणित कसे आहे. कोणत्या भागात अधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत, कोणत्या भागात प्रस्थापित लोकप्रतिनिधी विषयी नाराजी आहे. गेल्या दोन तीन निवडणुकांमध्ये कोणत्या भागात, कोणत्या वस्त्यांमध्ये, मतदारसंघागातील झोपडपट्ट्यांमध्ये कोणाला मतदान झाले होते, त्याची टक्केवारी काय होती, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायलाच हवा. आरक्षण कोणते आहे. जर आरक्षण बदलले तर पर्याय काय याचीही तयारी हवी. महिलांनी केवळ राखीवच नाही तर खुल्या मतदारसंघातही लढण्याची तयारी करायला हवी.
४. गोळा करा महत्त्वाचा डेटा :
कोणताही व्यवसाय असो वा उपक्रम तो यशस्वी व्हायचा असेल तर तुमच्याजवळ आवश्यक डेटा हवा. निवडणुकीसही हे लागू होते. यात मतदारसंघातील सर्व प्रकारच्या माहितीचा समावेश असेल. उदा. मतदारांची संख्या, बूथ निहाय मतदारांची यादी, मतदारांचे फोन नंबर, मतदारसंघातील प्रभावशाली व्यक्तींचे फोन नंबर, शिक्षण संस्था, वित्त संस्था, महापालिकेच्या वतीने केली जाणारी कामे, त्यावर केला जाणारा खर्च, गेल्या पाच वर्षांतील अर्थसंकल्पातील तरतुदी आणि प्रत्यक्ष झालेला खर्च, विद्यमान लोकप्रतिनिधींचे, विरोधकांचे जाहीरनामे अशी सर्व तपशीलवार सांख्यिकी माहिती आपल्याला हवी. त्याचा योग्य ठिकाणी वापर करता यायला हवा. बुथनिहाय संपर्क आणि प्रचार यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत.
५. मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न, कळीचे मुद्दे शोधा :
ज्या मतदारसंघात आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न कोणते, नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, कळीचे मुद्दे काय आहेत, नागरिकांचा असंतोष कोणत्या मुद्द्यांवर आहे, या सर्वांची माहिती असणे आवश्यक आहे. उदा. एखाद्या भागात पाणी पुरवठा नीट होत नसेल तर त्यामागची नेमकी कारणे काय आहेत, संबंधित महापालिकेचा पाणीपुरवठा का होत नाही? हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? हा प्रश्न कोणामुळे रेंगाळला आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, अशी प्रश्न निहाय माहिती-यादी आपण तयार करायला हवी. यातील काही मुद्दे घेऊन मतप्रदर्शन, आंदोलनही करायला हवे. मतदारसंघातील प्रश्नांसोबतच शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आदी नागरी प्रश्न आपल्याला माहिती हवेत. त्यावर तोडगा काढण्यासाठीचे उत्तरही आपल्याला देता यायला हवे.
६. स्वतः चे ब्रॅंडिंग करा :
स्वतःच्या वाढदिवसाची ठीक ठिकाणी होर्डिंग, बॅनर लावणे. स्वतःला ‘भावी नगरसेवक’, ‘भावी आमदार’ अशी संबोधने लावून घेणे म्हणजे स्वतःचा प्रचार किंवा ब्रॅंडिंग केले असे नव्हे. होर्डिंग लावून कधीही नेता होता येत नाही हे कृपया लक्षात घ्या. यापेक्षा तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिता त्या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेणे फायदेशीर ठरते. उदा. कोरोनाच्या काळात अनेकांनी रुग्णांना विविध प्रकारची मदत केली, औषधोपचार केले. घरोघरी डबे पोहोचवले अशा वैयक्तिक कामातून नागरिकांशी तुम्ही अधिक जोडले जाता. नुसते होर्डिंग्ज लावण्यापेक्षा वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, मतदारसंघातील तरुणांसाठी, महिलांसाठी कौशल्य विकास किंवा नोकरीविषयक मार्गदर्शनाचे कार्यक्रम, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठीचे मेळावे असे उपक्रम घेऊन त्याद्वारे प्रसिद्धी योग्य ठरते.
याशिवाय आज काही खाजगी कंपन्या ( Political Consultancy in Maharashtra, Election campaign company in Maharashtra ) या क्षेत्रात व्यावसायिक तज्ञांच्या मदतीने आपले संपूर्ण निवडणूक नियोजन करतात. हा अत्यंत प्रभावी उपाय असून आजकाल सर्वच यशस्वी नेते याचा खुबीने वापर करतात. यामुळे उमेदवाराला वेळ मिळतो. त्यातून अधिक चांगल्या योजना आखल्या जाऊ शकतात.
तुम्ही करीत असलेले काम सोशल मीडियाद्वारे तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या टारगेट ग्रुप पर्यंत म्हणजेच मतदारांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी नियोजन करावे. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडे हे काम सोपवावे. तुम्ही करत असलेल्या कामाचे ऊठ सूट लाईव्ह चित्रण करून नागरिकांचे आपण कसे वाली आहोत हे दाखवण्याचा जास्तीचा प्रयत्न करू नका. अति चमकोगिरीला नागरिक कंटाळतात हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. केलेले काम, एखाद्या प्रश्नाविषयी तुमची भूमिका, तो प्रश्न सोडवण्यासाठी करत असलेले प्रयत्न, प्रश्न जर मार्गी लागला असेल तर तो मार्गी लागल्याबद्दलची माहिती असे तुमच्या ब्रॅंडिंगचे स्वरुप असू द्या.
७. कार्यअहवाल सादर करा, नागरिकांशी बांधिल रहा:
लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाचा अहवाल मतदारांना द्यावा असा आग्रह ज्येष्ठ नेते रामभाऊ म्हाळगी यांनी धरला. त्यानंतर आज अनेक नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते दरवर्षी आपण काय काम केले, याचा अहवाल प्रसिद्ध करतात. या अहवालाच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचते याशिवाय आपण नेमके काय केले याचा स्वतः लाही अंदाज येतो. जर तुम्ही कार्यकर्ते किंवा पक्षाचे पदाधिकारी असाल आणि तुम्ही सामाजिक काम करीत असाल तर केलेल्या कामाचा अहवाल जरूर प्रसिद्ध करावा. तो तुमच्या पक्ष नेत्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करावी. त्यासाठी सोशल माध्यमांचा ही वापर करता येईल. यानिमित्ताने नागरिकांशी सतत संपर्क ठेवता येतो.
८. संघटनात्मक रचना समजून घ्या :
तुम्ही ज्या पक्षातून इच्छुक आहात त्या पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे हे नीट समजून घ्यावी. पक्ष पदाधिकाऱ्यांची यादी आपल्याकडे असावी. मतदारसंघामध्ये वरिष्ठ पक्षनेते कोण आहेत, त्यांच्याशी आपला संपर्क हवा. त्यांना तुमचे काम माहिती हवे. याशिवाय पक्षाशी संबंधित असणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती कोण आहेत याचीही माहिती करून घेणे आवश्यक आहे. उदा. जर तुम्ही भाजपमध्ये असाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना, स्वयंसेवक, हजारी यंत्रणा समजून घ्यायला हवी.
९. वरिष्ठ नेत्यांशी रहा कनेक्ट :
तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातील शहर पातळीवरील नेते, राज्य पातळीवर नेते, पदाधिकारी यांच्या तुम्ही सतत संपर्कात असणे आवश्यक आहे. राजकारणात चांगल्या अर्थाने कोणाचातरी वरदहस्त असणे आवश्यक असते. त्यामुळे हा संपर्क आवश्यक आहे. मात्र केवळ नेत्यांची हुजरेगिरी करण्यात किंवा गेस्ट हाऊसवर त्यांच्या मागेपुढे करण्यात वेळ घालवू नका. नेत्यांनाही अशी हुजरेगिरी करणारे लोक कोण आहे याची माहिती असते. त्यामुळे ते तिकीट देताना अशा लोकांचा विचार करीत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा. तुमचे उपक्रम, आंदोलने तुम्ही करत असलेले सामाजिक काम या माध्यमातून नेत्यांशी तुम्ही चांगल्या पद्धतीने जोडले जाऊ शकता. त्यातून तुमच्या विषयी नेत्यांच्या मनात चांगले मत तयार होऊ शकते.
१०. मतदारसंघातील प्रभावशाली व्यक्तींशी स्वतःला जोडा :
तुमच्या मतदारसंघात विविध क्षेत्रातील मान्यवर राहात असतात. नामवंत लेखक, डॉक्टर, उद्योजक, धार्मिक नेते, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच सोशल मीडियावर प्रभावशाली असणाऱ्या व्यक्ती यांच्याशी आपण संपर्कात राहायला हवे. अशा व्यक्तींशी सुसंवाद ठेवावा. त्यांच्या सूचना मार्गदर्शन घ्यावे. आपल्या उपक्रमांमध्ये अशा व्यक्तींचा सहभाग घ्यावा. यामुळे अधिकाधिक लोक जोडले जाण्यास मदत होते.
११. प्रसार माध्यमांशी संवाद ठेवा :
आपण केलेले काम, उपक्रम हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांशी आपला सततचा संपर्क हवा. आपल्या परिसरात किंवा शहरात प्रभावी असणारी वर्तमानपत्रे ,इलेक्ट्रॉनिक माध्यमे, स्थानिक चॅनेल, माध्यमांचे प्रतिनिधी कोण आहेत, प्रसिद्धीसाठी त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने कसे पोहोचता येईल. आपल्या भागातील महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल, आपल्या मतदारसंघातील योग्य ती माहिती देण्यासाठी त्यांचा सोर्स आपण कसे बनवू याचा विचार करावा.
१२. आर्थिक तयारी करा :
कोणतीही निवडणूक असेल तर त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च येत असतो. प्रचार, मेळावे, सभा, प्रचाराचे साहित्य, बॅनर, दररोजच्या पदयात्रा अशा अनेक कारणांसाठी हा खर्च होतो. निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली असते, त्यात राहून आपल्याला हा खर्च करावा लागतो. त्यामुळे अशा खर्चाची तयारी उमेदवाराला वैयक्तिक पातळीवरच करावी लागते. त्यासाठीचे नियोजन आधीपासूनच असायला हवे,
१३. कामकाज समजून घ्या :
जर तुम्ही महापालिकेची निवडणूक लढवू इच्छित असाल तर तुम्हाला निवडणूक लढविण्यापूर्वी महापालिकेच्या कामकाजाची किमान माहिती असणे अपेक्षित आहे. यात महापालिकेचे अंदाजपत्रक, महापालिकेची रचना, क्षेत्रीय कार्यालये, सर्वसाधारण सभा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा, प्रमुख अधिकारी व त्यांच्याकडे असणाऱ्या जबाबदारी यांची आपल्याला माहिती असायला हवी. गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या वतीने झालेली कामे, खर्च, अपूर्ण कामे, कोणत्या कामांची गरज आहे, नागरिकांची अपेक्षा काय आहे, महापालिकेची यंत्रणा कशी काम करत आहे, काय त्रुटी आहेत, काय सुधारणा करायला हवे याविषयी आपण अलर्ट असणे आवश्यक आहे.
१४. रहा लो प्रोफाइल :
नागरिकांना आपला लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य, आपल्या अडीअडचणीला सहज उपलब्ध होईल, असा लागतो. त्यामुळे जर तुम्ही निवडणूक लढवत असाल तर तुम्ही तुमच्या वागण्यात, बोलण्यात, कृतीत साधेपणा राहील याची दक्षता घ्यावी. सोन्याच्या साखळ्या, उंची घड्याळे, गाड्या असा भपकेबाजपणा करण्यापासून दूर रहा. आजकाल सोशल मीडियावर रीळ किंवा इतर व्हिडिओ क्लिप मध्ये भयंकर गाणी वापरली जातात. ‘ओ शेट’, ‘सरकार’ ‘नाद करायचा नाही’ अशी गाणी वापरुन स्वतः ला ‘ग्रेट’ समजण्याचा ट्रेंड आला आहे. त्यापासून दूर रहा. नागरिकांना अशा गोष्टी मुळीच आवडत नाहीत. त्यामुळे पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडिया यांचा वापर अधिक सावधान आणि चांगल्या पद्धतीने करा.
१५. निवडणूक प्रक्रिया घ्या समजून :
निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील सर्व मुद्दे काळजीपूर्वक समजून घ्या. मतदारसंघ रचना तयार होत असताना हरकती आणि सूचना घेण्यास काही कालावधी दिला जातो. जर तुमचा मतदारसंघ रचनेवर काही आक्षेप असेल तर तो अवश्य नोंदवा. त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरणे त्यासाठी लागणारी तयारी आधीपासूनच करा. अर्ज भरणे, अर्ज भरताना सादर करावयाची आर्थिक आणि इतर प्रतिज्ञापत्रे, संपत्तीचे विवरण या गोष्टी तुमच्या सीए कडून आधीच तयार करून घ्या, म्हणजे ऐन वेळी गडबड होणार नाही. निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या सूचना, नियम यांचा अभ्यास करा. हे नियोजन असल्यास ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही किंवा तुमच्याकडून नियमभंग होणार नाही.
१६. वैयक्तिक कामावर द्या भर :
आपल्या वैयक्तिक कामांस कोण उपयोगी पडतो हे मतदार निवडणुकीत नक्की पाहतो. त्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाची लाट असली तरी काही लोकप्रतिनिधी अशा वातावरणातही निवडून येतात. त्यामुळेच सुरवातीपासून सामूहिक कामे करतानाच नागरिकांची वैयक्तिक कामे करण्यावरही भर द्यायला हवा. उदा. आधार कार्ड काढून देणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, विविध प्रकारचे दाखले सहज उपलब्ध करून देणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आदी. वैयक्तिक काम मतदार सदैव लक्षात ठेवतो. हक्काचा मतदारांचा बेस तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे.
शेवटी निवडणूक हे एक शास्त्र आहे. एक तंत्र आहे. जर योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक तुम्ही निवडणूक लढविली तर विजयाची खात्री अधिक असते. तुमचे वैयक्तिक काम, तुमच्या पक्षाचे काम, तुम्ही केलेले प्रयत्न, प्रचाराचा प्रभाव या सर्व गोष्टी निवडणुकीत महत्त्वाच्या ठरतात. मात्र योग्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश नक्की मिळते, हे खरे.
“मतदाराने मला मत का द्यावे? हा प्रश्न स्वतःलाच विचारा आणि कामाला सुरवात करा. निवडणुकीत विजयी होण्यासाठी तुमची वैयक्तिक प्रतिमा, तुमची काम करण्याची पद्धत, शहराच्या प्रश्नांविषयीची जाण, तुम्ही लोकांना किती उपयोगी पडतात, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. पक्ष म्हणून 20 टक्के तर व्यक्तिगत 80 टक्के काम विजयी होण्यासाठी उपयोगी पडते. तुमचे चांगले कामच तुम्हाला विजयी करू शकते.”
” तुम्ही नागरिकांशी किती कनेक्ट आहात, त्यांच्या सुखदुःखात कसे सामील होता हे फार महत्त्वाचे आहे. मतदारसंघ आणि शहरपातळीवरील प्रश्नांची तुम्हाला जाण हवी. प्रश्न सोडवण्याची तुमची धडपड आणि प्रामाणिक काम तुम्हाला निवडणुकीत विजयी करतात.”
-
मंगेश खैरनार ( संस्थापक, Poller Minds)- +91 8007006698